छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आजचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून अपघाताची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शास्त्रीय पद्धतीने या महामार्गाचं नियोजन केलेलं नसावं. त्याचा दुष्परिणाम म्हणजे लोक मृत्यूमुखी पडत आहेत. ही घटना अतिशय दु:खद आहे. अशा प्रकारच्या घटना सतत होत आहेत. आम्ही ऐकतोय की, कुठेही अपघात झाला की, राज्य सरकार पाच लाख रुपये जाहीर करतं. पण पाच लाख रुपये देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झालंय ते अतिशय वाईट झालंय. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून अपघाताची चौकशी केली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.