सोलापूर:प्रभाग क्रमांक १९ मधील परिसर सोलापूर शहर हद्दवाढ भागात येतो. अनेक छोट्या-मोठ्या नगरांमध्ये आवश्यक तितके इलेक्ट्रिक पोल नसल्याने काही भागात अंधाराचे साम्राज्य आहे. शिवाय घरगुती लाईट कनेक्शन घेतानाही अनेकांना इतरांच्या जागेवरून लाईटची वायर घ्यावी लागली आहे. महालक्ष्मी नगर मधील पोल धोकादायक बनला असल्याचा मुद्दा २०१७ साली स्थायी समितीत फोटो रूपी पुराव्यासह उपस्थित केला होता. अनेक नगरांमध्ये दोन पोल मधील अंतर जास्त असल्यामुळे इलेक्ट्रिक पोलची मागणी होती. स्मार्ट सिटीच्या योजनेतून शहर व हद्दवाढमध्ये पोल बसविण्याचा विषय साधारण दीड वर्षापासून चर्चिला जात होता. पोलची आवश्यकता असलेल्या ठिकाणांचा सर्वे सुद्धा साधारण सव्वा ते दीड वर्षापूर्वी झाला आहे. अखेर आज दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर या कामाचा “श्रीगणेशा” झाला. प्रभाग क्रमांक १९ मध्ये साधारण तीनशे ते साडेतीनशे ठिकाणी हे इलेक्ट्रिक पोल बसवले जाणार आहेत. आज महालक्ष्मी नगर येथून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक व शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, किरण सिदमल, प्रवीण जवळकर, हणुमंत दिंडोरे, हणमंत बिराजदार, सोमनाथ कोळी, झोन क्र चारचे सुनील उपरे, मक्तेदार बजाज इलेक्ट्रिक कंपनीचे अभियंता रणजीत प्रधान, सिध्दनाथ ठोकळे, उत्तम मोडक आदी उपस्थित होते.