पुणे, दि. २७ – केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांनी सक्रियपणे काम करावे, असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी राज्यातील अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले.
पुणे येथील राष्ट्रीय फिल्म संग्राहालय येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरोच्या अधिका-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहाय बोलत होते. यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थित होते.
सहाय म्हणाले, केंद्र सरकारचे फ्लैगशिप कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिका-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्याचबरोबर जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून योजनांची माहिती द्यावी तसेच अमंलबजावणीची सदयस्थितीबाबत सरकारलाही अवगत करावे. योजनांच्या अंमलबजावणीचे संनियत्रणही अधिका-यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्यातील सर्व अधिका-यांना कार्यालयीन कामकाजासाठी टॅबचे वितरण करण्यात आले.दरम्यान, सकाळी पुणे शहरातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पत्रसूचना कार्यालय व इतर विभागांचा समन्वय साधण्यासाठी मध्यवर्ती इमारतीची आवश्यकता असल्याने सहाय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या जवळील भारत संचार निगमच्या इमारतीची पहाणी केली.
केंद्र सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यालयात अदयायावत तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार, जनसामान्य तसेच विदयार्थांना माहिती देण्यासाठी माध्यम केंद्र (Media center ), खुले सभागृह स्थापन करण्यात येणार असल्याचे सहाय यांनी सांगीतले. या वेळी बीएसएनएलचे प्रधान महाव्यस्थापक सुनिलकुमार, विपुल अग्रवाल, महाव्यवस्थापक पंकज मिश्रा, अधिक्षक अभियंता संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते.