पुणे, दि. २७: सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२०-२१च्या जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. या वाढीसह जिल्ह्याच्या ४२४.३२ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधानभवन येथे ही बैठक झाली.
बैठकीस पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, रामहरी रुपनवर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या ३४९.८७ कोटी रुपयांच्या आराखड्यास रविवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी लक्षात घेता राज्यस्तरीय बैठकीत ११६ कोटी रुपयांची मागणी करण्याची पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठकीत अधिकाची मागणी करण्यात आली. मात्र, वित्तीय मर्यादा लक्षात घेता ७४.४५ कोटी रुपयांच्या अधिकचा निधी देण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या वाढीव निधीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वित्तमंत्री पवार यांचे आभार मानले. मात्र, अर्थसंकल्पीय नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला आणखी निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
पवार म्हणाले, पुणे विभागात पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा आराखडा आहे. दिलेल्या वाढीव निधीतून कोणत्या विभागाला निधीची तरतूद करायची याबाबतचा निर्णय पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात यावा.
उजनी धरणातून सोलापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. यासंबंधित असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांची व्यापक बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीस जिल्हा प्रशासन, सोलापूर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एनटीपीसीशी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, असे पवार यांनी सांगितले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामे गतीने होण्यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष घालावे, असे पवार यांनी सांगितले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जलसंपदा विभागांचें अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शेखर साळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सहायक नियोजन अधिकारी दिलीप पवार, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले आदी उपस्थित होते.