इलेक्ट्रिक वाहने, ईथेनॉल, सीएनजी, आदींचा वापर वाढवून आगामी पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचा वापर संपुष्टात आणण्यात येईल
बांबू ईकोनॉमी गरजेची असून देशात रस्त्याच्या बाजूला बांबू लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बांबूचे उत्पादन घ्यावे, एका एकरात २०० टन बांबू होतो. बांबू सर्वात जास्त कार्बनडाय ऑक्साईड सोसून घेतो. वीज निर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबूचा वापर करता येतो. यामुळे स्वस्तात वीजनिर्मिती होईल, देशाचे १६ लाख कोटी रुपये वाचून ते शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाता बनेल. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडलेल्या ५१ वटवृक्षाचे पुनर्रोपण पैठण येथे यशस्वी करण्यात आले आहे. या पुनर्रोपित वटवृक्षाची पाहणी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे, अभिनेता सयाजी शिंदे, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे व एन. एच. आय.चे अधिकारी उपस्थित होते. ५१ वटवृक्षाचे यशस्वी पुनर्रोपण करण्याचा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगून गडकरी यांनी सयाजी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच प्राधिकरणाच्या वतीने देशात साडेतीन कोटी झाडांचे रोपण करण्यात आले असून या वर्षात ६१ हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.