सोलापूर : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तालुकानिहाय महाशिबिरांचे आयोजन करून आतापर्यंत 1,23,212 लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले असून याबाबत लाभार्थींच्याही सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी ही माहिती दिली.
शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी” हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात दि. 15 एप्रिल ते दि. 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकामी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहेत. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असून सोलापूर जिल्ह्यात अभियानादरम्यान १.५ लाख लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अभियान नियोजनाचा व अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनामार्फत दररोज आढावा घेण्यात येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागांतर्गत फेरफार नोंदी निर्गती, विविध प्रकारचे दाखले वाटप, पी. एम. किसान योजना असे एकूण 60 हजार लाभार्थी, जिल्हा परिषदेमार्फत 20 हजार, कृषि विभागामार्फत 8 हजार व नगरविकास / बांधकाम / आरोग्य / परिवहन व इतर विभागामार्फत 65 हजार लाभार्थींना एकाच छताखाली लाभ देणेकामी महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांना विविध सामाजिक, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विविध कार्यालयात जाऊन जमवाजमव करणे, जमा केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयात जाणे अशा किचकट प्रक्रियेस सामोरे जावे लागते. नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांचा बराचसा वेळ व पैसा खर्च होतो. काही वेळा लोकांना शासकीय योजनांची माहिती नसल्याने योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. अभियानामुळे एकाच छताखाली नागरीकांना अल्प कालावधीत जलद सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमिवर शासन आपल्या दारी हे अभियान लोकोपयोगी ठरत आहे.