मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बिपरजॉय चक्रीवादळाचं अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झालं असून भारताच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका आहे. पुढील 48 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी चक्रीवादाळाची परिस्थिती आणि किनारपट्टी भागातील उपाययोजनांचा आढावा घेतला. किनारपट्टी भागातील लोकांचं सुरक्षिण स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरात किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टी भागात धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. एनडीआरएफच्या (NDRF) चार तुकड्या गुजरातच्या किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत.