सोलापूर : सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत महापालिकेने दिलेली 45 दिवसाची मुदत अकरा 11 जून रोजी संपत आहे. तत्पूर्वी सिद्धेश्वर कारखान्याने चिमणी वाचवण्यासाठी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. याची सुनावणी 12 जून रोजी होणार होती मात्र हायकोर्टाने ही सुनावणी आजच ठेवली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत हायकोर्टात यावर काय निकाल लागतो, याकडे सोलापूर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
25 डिसेंबर 2012 साली कारखान्याने एनओसीसाठी अर्ज दिला होता. 18 फेब्रुवारी 2014 रोजी एअरपोर्ट ॲथॉरिटीने कलेक्टरला पत्र लिहून बेकायदेशीर चिमणी बांधली जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कलेक्टरने महापालिकेला पत्र पाठवून ही चिमणी पाडावी असे आदेश दिले होते. 24 फेब्रुवारी 2014 रोजी महापालिकेने कारखान्याला पत्र लिहून सात दिवसात चिमणी पाडा अशी नोटीस देताच कारखान्याच्या एमडीनी ३ मार्च 2014 रोजी सात दिवसाऐवजी आम्हाला नव्वद दिवसाची मुदत द्या आम्ही चिमणी पाडून घेतो असं लेखी पत्र महापालिकेला दिल आहे. त्यानंतर 12 एप्रिल 2017 रोजी कारखान्याने हायकोर्टात धाव घेतली. पुन्हा कारखान्याने ही चिमणी पाडून घेतो असे लेखी पत्र देखील दिले होते. जिल्हा न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कुठेही कारखान्याच्या बाजूने निकाल लागला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी विलंबाने का होईना सुनावणी घेऊन त्याचा निकाल 28 मे रोजी दिला आणि चिमणी बेकादेशीर ठरवत 45 दिवसात चिमणी पाडावी असा आदेश दिला. याची मुदत दोन दिवसात संपत असताना कारखान्याने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे