सोलापूर : कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, यादगीर, रायचूर या जिल्ह्यांमध्ये मोठे पाणी संकट उद्भवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘वारणा-कोयना’तून दोन तर व उजनी धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. परंतु, सद्य:स्थितीत ‘नाकापेक्षा मोतीच जड’ अशी अवस्था आहे. ‘उजनी’ मायनस २५ टक्क्यांवर असून कर्नाटकला पाणी पोचण्यासाठी धरणातून १० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तर वारणा ते कर्नाटक १०० किलोमीटर अंतर असल्याने त्यासाठी दीड-दोन टीएमसी जास्त पाणी सोडावे लागेल. पण, सध्या तशी परिस्थिती नसल्याने कर्नाटकला पाणी देता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी शासनाला कळविलेल्या अहवालानुसार दिसून येते.सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असल्याने प्रचंड उकाडा जाणवत असून पाऊस लांबल्यास जिल्ह्यावर जलसंकट येवू शकते. अश्या परिस्थिती कर्नाटकसाठी पाणी देणे योग्य ठरणार नाही.
सद्य:स्थितीत उजनी धरण मायनस २५ टक्क्यांवर गेले असून आता कॅनॉल, बोगद्यातून पाणी सोडणे अशक्य असून मायनस ७० टक्क्यांपर्यंत नदीतून पाणी सोडता येते, तेही केवळ पिण्यासाठीच तर धरणात सध्या ५०.६१ टीएमसी मृत पाणीसाठा असून त्यात १४ टीएमसीपर्यंत गाळ आहे .पाऊस लांबल्यास पुन्हा एकदा सोलापूर शहर व ग्रामीण भागासाठी नदीतून सोडावे लागेल.तसेच आगामी पंढरपूर यात्रेसाठी ही पाण्याची गरज आहे.भीमा नदीद्वारे उजनी ते औज हे अंदाजे १४३ किलोमीटर अंतर पार करायला सहा टीएमसी पाणी लागते. कर्नाटकला तीन टीएमसी पाणी देण्यासाठी किमान नऊ-दहा टीएमसी पाणी लागेल, त्यामुळे असा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून कर्नाटकसाठी पाण्याचा निर्णय हा वरिष्ठच घेतील तो अधिकार आम्हाला नाही.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता,उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण