सोलापूर शहरात मोदी लाट आलेली असताना देखील शहराचा मोठा परिसर असलेल्या रामवाडी, सेटलमेंट या भागातून नागेश गायकवाड यांना तीन वेळा तर किसन जाधव यांच्यासह परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आणणारे लक्ष्मणमामा जाधव हे किंगमेकर ची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष लक्ष्मण मामा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरिक गौरव सत्कार समारंभात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली आणि तेथेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाच्या कार्याची माहिती घेतली.
आगामी महापालिका निवडणुक नियोजन आणि त्यावरील भिवरचना या संदर्भात चर्चा केली आणि काही सूचना केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार,अनिकेत पिसे अरुण रोडगे दशरथ कसबे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष स्थापनेपासून पक्षासाठी लक्ष्मणमामांनी शहरातून जे योगदान दिले ते नक्कीच कौतुकास्पद आहे असे सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले,
हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी पक्षाचे कार्य करत कुटुंबांची ही जडणघडण केली. सध्याही पक्षासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते हे सोलापूर येथे आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आणि सपाटे महापौर असताना शहरातून राष्ट्रवादीची पाच हजार कार्यकर्त्यांची सद्भावना मोटरसायकल रॅली काढली होती. ती पक्षासाठी मोठी फायदेशीर ठरली होती याची दखल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी काढली. ७५ वर्षे जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभाग होऊन त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली छवी निर्माण केली आहे. राष्ट्रवादी आणि पवार यांच्यावर सच्चे प्रेम करणारे मामा यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.