मुंबई : १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे, तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे. महारेराकडे मार्च अखेरपासून नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करुन दिलेले आहेत.
विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती (Advertisement) करत असतात. कुठलेही माध्यम वापरुन केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा वेबसाईटसोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.