आज नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यादरम्यान, दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूजा आणि हवन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सेंगोलची पूजाही केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडपुढे नतमस्तक होऊन उपस्थित संतांचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेबाबत निर्णय घेतांना विरोधकांशी चर्चा झाली नाही.
नवीन संसदेत उद्घाटनाच्या नावाखाली केवळ कर्मकांड केलं, असा घणाघात त्यांनी केला. शरद पवार म्हणाले की, मी आज सकाळी टीव्हीवर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर मी तिथं गेलोच नाही, हे बरचं झालं असं मला वाटलं. कारण, तिथं जे काही कर्मकांड सुरू होतं, त्यावरून नेहरूंनी आधुनिक विज्ञानाच्या आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याला तिलांजली दिली. त्यामुळं पुन्हा एकदा आपण काही वर्ष पाठीमागे जातो की काय? असं वाटायला लागलं.