लडाख: देशभरात सर्वत्र ७१ व्या प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू असून सीमेवरसुद्धा तितक्याच जल्लोषात जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या तुकडीने आज तब्बल १७ हजार फुटांवर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
भारत आणि तिबेटच्या सीमेवर तैनात असलेल्या इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या ( आयटीबीपी) एका तुकडीने उणे २० अंश सेल्सियस इतक्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन केले. जवळपास १७ हजार फुटांवर या जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. हाती तिरंगा घेऊन जवानांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात जवानांच्या राष्ट्रभक्तीचे कौतुक होत आहे. देशाच्या सीमेवर हजारो जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. पाऊस असो किंवा हिम वादळ अशा कठीण परिस्थितीत जवान आपले कर्तव्य बजावत असतात.