सोलापूर – (प्रतिनिधी ) – तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या विधान सल्लागाराला ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई शुक्रवारी २४ जानेवारी २०२0 रोजी सायंकाळी झाली.अरुण नागनाथ सोनटक्के ( वय ४०,राहणार शेळगी ,सोलापूर)असे लाच घेतलेल्या विधान सल्लागाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दवाढ परिसरातील एका जागेच्या संदर्भात सोलापूर महानगरपालिका उपायुक्तांकडे तक्रार आली होती.त्या प्रकरणी मनपा उपायुक्तांनी अभिप्राय घेण्यासाठी महापालिकेचे विधान सल्लागार अरुण सोनटक्के यांच्याकडे हे प्रकरण पाठविले होते.त्यानंतर या प्रकरणामध्ये अभिप्राय तक्रारदाराच्या बाजूने करून देण्यासाठी विधान सल्लागार सोनटक्के यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यावर तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत विभागाकडे गुरुवारी तक्रार दिली होती.लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली.त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या समोर विधानसल्लागार अरुण सोनटक्के यांनी ५० हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपतचा साफळा असल्याचे समजताच सोनटक्के तेथून बेगमपेठच्या दिशेने पळाला.पोलिसांनी त्याला किडवाई चौक ते बेगम पेठ पोलीस चौकी दरम्यान पाठलाग करून पकडले.आणि महापालिकेत आणून सायंकाळी त्याची चौकशी केली.त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आणि सदर बझार पोलीस ठाण्यात लाचखोर अरुण सोनटक्के याच्या विरुद्ध फिर्याद दिली.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे,सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर,श्रीरंग सोलनकर,हवालदार चंद्रकांत पवार,पदभानभ चंगरपल्लू,पोलीस शिपाई सिद्धाराम देशमुख आदींनी पार पाडली.