मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने विजय मिळवला. काँग्रेसने १३५ जागांवर हाताचा छापा पाडत भाजपाचे कमळ फुलू दिले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे.
मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळ्याचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे’, अशा शब्दांत सामनातून भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 65 या आकडय़ावरच लटकला. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून भाजपकडून दक्षिणेतले एकमेव राज्य हिसकावून घेतले. देशात 2024 साली काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव ठरलेलाच होता. मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली. काँग्रेस कर्नाटकात एकसंध होती. नेत्यांत मतभेद असले तरी त्यांनी ते निवडणुकीच्या दरम्यान उघड केले नाहीत.