सोलापूर : उद्धव ठाकरे हे ना चांगले मुख्यमंत्री बनले, ना चांगले पक्षप्रमुख. मुख्यमंत्री असताना ते कधी मंत्रालयात आले नाहीत तर पक्षप्रमुख असताना त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही. त्यामुळे आता सध्या ते रिकामे आहेत. त्यामुळे ते संजय राऊत यांना हाताशी धरून रोज रडत असतात. आतापर्यंत त्यांच्या झालेल्या सभेत ते फक्त रडतच होते. त्यामुळे ते बाळासाहेबांसारखे लढवय्ये नाही तर रडवय्ये नेते झाले आहेत, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सोलापुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा घेण्यासाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व इतर कोणी काही म्हणतात त्याला महत्त्व नाही.न्यायालयाचा निकाल स्वतःच्या सोयीने लावून वारंवार जनतेमध्ये चुकीचे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून न्यायालयाचा अवमान होत आहे. भाजप या सर्व क्लिप आणि माहिती गोळा करून न्यायालयाचे हे निदर्शनास आणून देईल. कोर्टाच्या निर्णयानंतर आता त्यांच्याकडील उरले सुरले नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये येतील आणि उद्धव सेनाही किंचित सेना राहील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
संजय राऊत रोज सकाळी भोंग्याप्रमाणे रोज बोलतात. नुकतेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. वास्तविक पाहता फडणवीस यांच्यावर टीका करण्याची त्यांची पात्रता नाही. देवेंद्र फडणवीस यांचे रक्त भाजपचे होते आणि भाजपचे राहणार आहे. उद्धव सेनेसारखे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे त्यांचे रक्त नाही. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावाप्रमाणे सांभाळले आहे. एक वेळ त्यांनी भाजपच्या नेत्यांची कामे केली नाहीत मात्र शिवसेनेच्या नेत्यांची सर्व कामे केली आहेत़. हे उपकार त्यांनी विसरू नये. संजय राऊत हे काँग्रेसच्या साबणाने आंघोळ करतात आणि उध्वव सेनेला धुवून काढतात तसेच पवारांचा टिळा लावतात अशा शेलक्या शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली.
या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉक्टर जयसिध्देश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते हे उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा तमाशा सगळ्यांनी बघितला
शरद पवारांना कोणीही राजीनामा द्यायला सांगितला नव्हत. त्यांनी राजीनामा दिला त्यांनीच नेमलेल्या समितीने तो फेटाळला आणि त्यांनीच पुन्हा राजीनामा मागे घेतला असे हे तीन दिवसाचे वगनाट्य होते महाराष्ट्राला एक चांगला तमाशा पाहायला मिळाला वास्तविक पाहता शरद पवार यांनी राजीनामा द्यायला नको होता दिला तर तो माघारी घ्यायला नको होता यावरून राष्ट्रवादीमध्ये दुसरे कोणतेही नेतृत्व नाही हेच सिद्ध होते. अजित पवार यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्यातले कोणीही त्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले नाही. खुद्द अजित पवार यांनीही आपण भाजपमध्ये जाणार नाही असे सांगितले नंतर हा प्रश्न मिटला आहे असे मला वाटते असेही बावनकुळे म्हणाले.
कॉंग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही मिळणार नाहीत
काँग्रेसला भारत जोडोचा कोणताही फायदा होणार नाही. ज्यावेळी नांदेडपासून शेगावपर्यंत ही यात्रा जात होती, त्यावेळी हजारो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर कोणालाही वाटणार नाही असे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसला तर लोकसभेसाठी उमेदवारही मिळणार नाहीत. मागच्या वेळीच पेक्षा कमी जागा काँग्रेसला यावेळेस मिळतील असेही बावनकुळे म्हणाले.
भाजप लोकसभेला सर्व जागा जिंकेल
कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे संविधान एकच होते हे सिद्ध झाले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा भाजप व सेना एकत्र लढणार आहे. विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा आणि लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा भाजप निश्चित जिंकेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या चुकीच्या निर्णयाने लांबणीवर पडल्या आहेत. चुकीची प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने सदस्य संख्या वाढवणे असे प्रकार केले आहेत. जनगणना झाली नाही तरीही महाविकास आघाडीने प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. आमचे सरकार आल्यावर 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग संख्या केली मात्र त्या विरोधात महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. त्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. आमची उद्याही निवडणुकीत झाल्या तरी तयारी आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले