सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 मे रोजी जिल्हाभरात हातभट्टी दारूविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत 11 गुन्ह्यात 13700 लिटर गुळमिश्रित रसायन व 1700 लिटर हातभट्टी दारुसह चार लाख त्र्याहत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा या ठिकाणी पथकासमवेत धाडी टाकण्यात आल्या. निरिक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने मुळेगाव तांडा येथील निकिता अर्जुन चव्हाण, वय 30 वर्षे या महिलेच्या राहत्या घरातून तीन रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 300 लिटर व रतनबाई सोमनाथ राठोड वय 42 वर्षे या महिलेच्या ताब्यातून दोन रबरी ट्यूबमधील 200 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच संजय किसन राठोड (वय 42 वर्षे) व राजू संजय राठोड (वय 22 वर्षे) यांच्या घराची झडती घेतली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारुचा साठा मिळून आला. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून बारा रबरी ट्यूबमधील 1200 लिटर हातभट्टी दारु व वीस रिकाम्या रबरी ट्यूब असा एकूण 63 हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीमा तपासणी नाका व भरारी पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 8850 लिटर रसायन जागीच नाश केले. तसेच रोहिणी गुरव दुय्यम निरिक्षक ब-1 यांच्या पथकाने बक्षीहिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर परिसरात सिताराम तांड्याच्या पूर्वेस काटेरी झुडपात चालू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून 1700 लिटर रसायन जागीच नाश केले असून आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. निरिक्षक पंढरपूर विभागाच्या पथकाने करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक 1 ढोकरी रोडच्या बाजूस शेतामध्ये सुरु असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून गणेश सहदेव जाधव या इसमास अटक केली. सदर कारवाईत 3050 लिटर गुळमिश्रित रसायन जागेवरच नाश करण्यात आले.एका अन्य कारवाईत निरीक्षक अ विभाग सूरज कुसळे यांच्या पथकाने देगाव हद्दीतील देशमुख वस्ती याठिकाणी अवैधरित्या ताडीची वाहतुक करताना एका दुचाकी वाहनासह 80 लिटर ताडी जप्त करुन गुन्हा नोंद केला. दुचाकीस्वार वाहन जागेवर सोडून पळून गेला असून त्याचेविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत 80 लिटर ताडी व वाहन असा एकूण 76 हजार सातशे साठ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वात प्रभारी उपअधीक्षक सदानंद मस्करे, निरिक्षक सूरज कुसळे, पवन मुळे, सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक रोहिणी गुरव, अक्षय भरते, सचिन गुठे, मयूरा खेत्री, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, प्रकाश सावंत, योगीराज तोग्गी, शोएब बेगमपुरे, अनिल पांढरे, भाग्यश्री शेरखाने, विकास वडमिले, वाहनचालक संजय नवले व रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.