सोलापूर – मधमाशापालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थी व संस्थास मधमाशी मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी मधमाशा उद्योगामध्ये सातेरी, मेलीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेणा-या घटकांनी मधमाशी मित्र पुरस्कारासाठी दिनांक 8 मे 2023 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यातील उद्योगाला चालना व गती देण्यासाठी राज्यातील मधमाशापालन उद्योगातील कार्य करणा-या प्रगतशील घटकांची निवड करुन मधमाशी मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर मधमाशी मित्र पुरस्काराचे वितरण मध संचालनालय, महाबळेश्वर येथे दिनांक २० मे २०२३ रोजी होणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याकरीता जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा ग्रामाद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर. व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, किनारा हॉटेल समोर, होटगी रोड, सोलापूर येथून अर्ज प्राप्त करुन माहिती भरुन अर्ज करावेत असे आवाहनही जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.