शिवस्मारक येथे ५० दिवस निशुल्क योग अभ्यास शिबीराचे उदघाटन
सोलापूर : योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते असे प्रतिपादन योग सेवा मंडळाचे अध्यक्ष मनमोहन भुतडा यांनी केले.
२१ जून रोजी होणाऱ्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि योग सेवा मंडळ, यांचे सयुंक्त विद्यमाने दिनांक २ मे ते २० जून २०२३ पर्यंत सकाळी ५.४५ ते ०७.०० वाजेपर्यंत शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे आयोजित विशेष योग अभ्यास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सोलापूर शहरातील योग समन्वय समिती, पतंजली योग पीठ, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, गीता परिवार, सर्व कल्याण योग स्काय, योग साधना मंडळ, सोलापूर जिल्हा योग परिषद, योग असोसिएशन, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट योग, नेहरू युवा केंद्र आणि योग सेवा मंडळाच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सदरील योग शिबिराला सुधा अळळीमोरे, संगीता जाधव, नंदकुमार चित्तापुरे, रघुनंदनदन भुतडा, रजनी दळवी, विजकुमार गुंजाळे, आनंद टाके, राजशेखर लक्ष्मेश्वर, बी एन पाटील, डी पी चिवडशेट्टी, रमेश सोनी, रोहिणी उपळाईकर, देवानंद चिलवंत, दत्तगुरू वेदपाठक, डॉ. शोभा शहा, जितेंद्र महामुनी, प्रकाश जाधव, सुहास देशपांडे, लता माळगे, राजू जुंजा, सुनील आळंदी आणि संगीता सुरेशजी जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील योग दिनानिमित्त केंद्रिय संचार ब्युरोच्या @CBCSolapur या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलवरून दररोज एक योग आसनांची चित्र व मजकुरासहित माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे योग सराव करण्यास मदत होणार आहे.
शिबिराची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेस पुष्पार्पणाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवस्मारकचे प्रमुख रंगनाथसा बंकापुरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, नेहरू युवा केंद्राचे जिला युवा अधिकारी अजितकुमार, राष्ट्रीय सेवा संघाचे चंद्रकांत पटवर्धन, गीता परिवारचे संगीता जाधव, सोलापूरच्या पतंजली योगपीठ चे प्रतिनिधी रघुनंदन भुतडा, भारतीय योग संस्थाचे अध्यक्ष डी पी चिवडशेट्टी, रोटरी क्लबचे विद्या मनुरे, लायन्स क्लबचे मोहन भुमकर आणि भारत स्वाभिमान ट्रस्टचे माधुरी पारपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात शंखध्वनीने करण्यात आली. जितेंद्र महामुनी यांनी सूर्य नमस्कार आणि आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे शिथिली करण्याचे व्यायाम, उभी व बैठे योगासने, पोटावरील व पाठीवरील योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणाचे सराव घेतले.
यावेळी नियमित व उत्कृष्ट योग अभ्यास करणा-या सतीश अग्रवाल, सोनल जगताप, प्रकाश पाये, विद्या होनमोरे आणि गोदावरी भागानगरे इत्यादी साधकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आले. सदर शिबीर सर्वांसाठी निशुल्क असून याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव व नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अधिकारी अजितकुमार यांनी केले आहे.