राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभल्याने पर्यटन क्षेत्रात अनेक संधी आहे. मोठी संधी आहे. शिवकालीन गड-किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तूंसह विविध धार्मिक शहारांमुळे पर्यटन क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे.राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन पर्यटन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. (Fellowship opportunity for youth in field of tourism initiative of Maharashtra Tourism Development Corporation nashik news)
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रमातंर्गत २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्ण प्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेतील अंतर कमी करण्यास मदत होणार आहे.
समाजमाध्यम, निर्मिती, ब्रॅंडींग, डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, प्रसिद्धी, आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टिकोन मिळवणे आदी बाबी या उपक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत. सदर फेलोशिप उपक्रमासाठी २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.