श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन
सोलापूर : भारतीय डॉक्टर व परिचारिकांचा विशेषतः दक्षिण भारतातील परिचारिकांचा परदेशात सर्वत्र बोलबाला आहे. हे समर्पित भावनेने काम करणारे क्षेत्र असून, कोविड काळात याचा प्रत्यय आला आहे. कोविड काळात परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून केलेले काम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.
कुंभारी (ता. द. सोलापूर) येथील श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या नवीन बी. एस्सी (नर्सिंग) महाविद्यालयाच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सर्वश्री राजन पाटील, प्रकाश येलगुरवार आणि नरसिंग मेंगजी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, एम. एम. पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बिपीन पटेल यांच्यासह ट्रस्टचे संचालक उपस्थित होते.
श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय, आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या तुलनेत दर्जेदार नर्सिंग शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या कमी होती. याउलट आखाती देशांसह सर्व जगभरात भारतीय डॉक्टर व दक्षिण भारतातील परिचारिका यांचा बोलबाला आहे. नवीन नियमानुसार कार्यरत वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंग कॉलेजला मान्यता दिल्याने दर्जा वाढून, परिपूर्ण शिक्षण मिळेल व परिचारकांची दर्जेदार पिढी घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, या भव्य दिव्य नर्सिंग महाविद्यालयातून ज्ञानाने परिपूर्ण पिढी घडावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण प्रयत्नरत असल्याचे सांगून विखे पाटील यांनी राज्यातील दोन वंदे भारत ट्रेन्स, सोलापूरमधून गेलेले तीन राष्ट्रीय महामार्ग यांचा उल्लेख करत एमआयडीसीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र हे खऱ्या अर्थाने लोकसेवेचे, देह झिजविण्याचे काम असून, कोविड काळात डॉक्टर, परिचारिकांनी समर्पण भावनेने काम केले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी तत्कालिन राष्ट्रपती उपस्थित राहिले होते. नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री उपस्थित आहेत, याचा आनंद आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे व ते चालवणे हे कठीण काम असते. प्रवरा येथील वैद्यकीय महाविद्यालय सुव्यवस्थित चालविण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्य भूमिका आहे. याच पद्धतीने सोलापूरच्या विकासासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभो, असे सांगून सेवेचे व्रत या नर्सिंग महाविद्यालयातून पुढे चालू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण व त्यानंतर फीत कापून महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी महाविद्यालयाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात बिपीन पटेल यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा हेतू विषद केला. आभार अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास विविध पदाधिकारी, अधिकारी, महाविद्यालयाचा शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.