सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. महाराष्ट्रात देखील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, कांद्याचे दरात नेमकी घसरण का झाली? याची माहिती पाहुयात…
बाजारात कांद्याची आवक वाढली, दरांवर परिणाम
देशातील महाराष्ट्र , गुजरात आणि राजस्थानमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. यावर्षी देखील या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतलं आहे. उत्पादन वाढल्यानं बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर देशातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. कांद्याच्या पिकाचंही या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तसेच हवामानातील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळं कांदा खराब होत आहे. याचा परिणाम दरांवर होत असल्याचं चित्र दिसत आहे. बाजारात शेतकऱ्यांचा कांदा निम्म्या भावाने विकला जात आहे.
अवकाळीसह गारपीटीचा कांद्याला फटका
कांदा स्वस्त होण्यामागे अवकाळी पाऊस हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. कांदा खराब होऊ नये, यासाठीच मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात पाठवला जात आहे. खराब होण्याच्या भीतीने शेतकरी मंडईत कांदा घेऊन जात आहेत. बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा झाला असून, त्याचा दरांवर परिणाम होत आहे.
कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर
राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळे वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळे एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.