सोलापूर : संत, महापुरुषांची जयंती म्हणजे केवळ धांगडधिंगा नसून ते वैचारिक प्रबोधनाचे व्यासपीठ आहे. म्हणून जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळ समाजात अध्यात्मिक क्रांती घडविणार आहे. त्यासाठी महामंडळातर्फे सामूहिक इष्टलिंग पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे ट्रस्टी सचिव शिवराज झुंजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लिंगायत समाजातील युवकांनी एकत्र येत यावर्षी जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाची स्थापना केली आहे. यंदाचे प्रथम वर्ष आहे.
शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून जलकुंभ मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी ५०० सुवासिनी जलकुंभ घेऊन सहभागी होणार आहेत. तसेच या मिरवणुकीत पालखीचाही समावेश असणार आहे. ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने ही सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. भगवे ध्वज, महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची वचने असलेले फलक, महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या शरणांची प्रतिमा असलेले फलक हाती घेऊन मोठ्या संख्येने युवक या मिरवणुकीत सहभाग होणार आहेत. श्री मल्लिकार्जुन मंदिरातून सुरू झालेली ही मिरवणूक बाळीवेस, (बसवेश्वर सर्कल) कोंतम चौकात विसर्जित होईल. या ठिकाणी काशीपीठाचे उत्तराधिकारी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आणि सुवासिनींच्या हस्ते जगतज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीस जलाभिषेक करण्यात येणार आहे.
तरी सोमवारी सकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सामूहिक इष्टलिंग पूजा योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. अमरनाथ सोलपूरे यांचे ‘इष्टलिंग पूजेचे वैज्ञानिक महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच लिंगपूजा कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास येताना सर्व भक्तांनी पूजासाहित्य सोबत आणावे. पूजेसाठी लागणारे जल महामंडळाकडून देण्यात येणार असून कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ट्रस्टी सचिव श्री. झुंजे यांनी सांगितले.
इष्टलिंग पूजेमागे असते अगाध विज्ञान
लिंगायत समाजातील सणांना, धार्मिक कृतींना वैज्ञानिक महत्त्व आणि कारण आहे. मात्र याची माहिती अनेकांना नसते. याचकरिता जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळातर्फे युवकांना इष्टलिंग पूजेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
सामूहिक इष्टलिंग पूजा योग सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक इष्टलिंग पूजा योग सोहळ्यास अधिकाधिक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गोपाटील, सदस्य अमित रोडगे, उत्सव अध्यक्ष संदीप दुगाणे, उत्सव उपाध्यक्ष साईप्रसाद पाटील, उत्सव उपाध्यक्ष बाळासाहेब आडके व महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.