प्रा. जयवंत आवटे, सिईओ दिलीप स्वामी व प्रा. देवानंद जंबगी यांची हजेरी
सोलापूर : जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या नवव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प मंगळवार (दि. 18) प्रा. जयवंत आवटे (सांगली) हे ‘तिमिरातून तेजाकडे’ या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते, आयकर विभागाचे उपायुक्त प्रसाद मेनकुदळे यांच्या अध्यक्षतेखाली तर मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दुसरे पुष्प बुधवारी (दि. 19) सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (लातूर) हे ‘जगण्याची सकारात्मक शैली’ या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्या अध्यक्षतेखाली तर सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
समारोपाचे पुष्प गुरूवारी (दि. 20) रोजी प्रा. देवानंद जंबगी (सांगली) हे ‘आद्य स्त्री उद्धारक : महात्मा बसवण्णा’ या विषयावर गुंफणार आहेत. या पुष्पाचे उद्घाटन धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या हस्ते, पोलीस उपायुक्त दीपक आर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तर पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून 5 श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देणार येणार आहे. तरी सोलापूरवासियांनी बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, सचिन विभूते, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.