सोलापूर – संगमेश्वर व सिध्देश्वर शिक्षण संकुलाच्यावतीने एकवीस हजार झाडे लावणार असल्याची घोषणा धर्मराज काडादी यांनी केली. ते पर्यावरण जनजागृती सभेत काल बोलत होते. ”जागतिक पर्यावरण जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर वृक्ष संगोपन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशांनी देखील प्रयत्नपूर्वक झाडे लावली पाहिजेत. शाळा, महाविद्यालय, अपार्टमेंटस , सरकारी व खाजगी आस्थापना यामध्ये देखील वृक्षसंगोपन संकल्पना रुजवली पाहिजे.” असे विचार संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित पर्यावरण जनजागृती सभेत मांडण्यात आले.
या बैठकीस श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्राचार्य गजानन धरणे, डॉ.मनोज पाटील (सांगली प्रांत मंडळ) मीनाताई मोकाटे (नारीशक्ती जिल्हाप्रमुख ) श्रद्धा अध्यापक (नारीशक्ती सह जिल्हाप्रमुख ) प्राचार्य यादगिरी कोंडा, संगमेश्वर कॉलेजचे प्रा.डॉ.राजेंद्र देसाई, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, प्राचार्या गायत्री कुलकर्णी , पर्यावरण संवर्धन गतीविधी शहर संयोजक अनिल जोशी, पर्यावरण संरक्षण गतीविधी जिल्हा संयोजक प्रविण रा.तळे , आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी सिद्धेश्वर प्रशालेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांचा संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वतीने सत्कार झाला. सत्कारानंतर प्राचार्य गजानन धरणे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर लोकल टू ग्लोबल पर्यंत पर्यावरण संरक्षणाची गरज कशी आहे याबद्दल मान्यवर पर्यावरण प्रेमींनी विचार मंथन केले. यावेळी प्रविण तळे यांनी सोलापुरातील धूळ, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण हे सर्व दूर होण्यासाठी सोलापूर जिल्हामध्ये येत्या तीन वर्षात मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून सोलापूरचे तापमान 10° सेल्सिअस पर्यत कमी करून दाखवण्याचा माणस बोलून दाखवला. यामध्ये प्रमोद मेणसे, शिवानंद हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात धर्मराज काडादी यांनी पर्यावरणवादी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारांना पुष्टी देत कर्मयोगी अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या सर्व धार्मिक , सामाजिक व शिक्षण संस्थांतून आणि संगमेश्वर व सिध्देश्वर शिक्षण संकुलाच्यावतीने एकवीस हजार झाडे लावण्याचा संकल्प आजच्या सभेत केला.
श्री सिध्देश्वर साखर कारखाना शेतकरी सभासदांकडून भविष्यात तीन लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येईल अशीही घोषणा या सभेत धर्मराज काडादी यांनी केली. यापुढील ही मोहिम दैनंदिक संचार व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचवतीन चालविण्यात येईल अशी घोषणा धर्मराज काडादी यांनी याप्रसंगी केली. प्लास्टिकमुक्ती ,कंपोस्टींग खत, पर्यावरण सहली असे अनेक पर्यावरण जनजागृतीचे उपक्रम आपल्या शिक्षण संकुलात राबवावे असे आवाहन डॉ. मनोज पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
यावेळी संगमेश्वर शिक्षण संकुल आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे सर्व विभागाचे प्राचार्य,पर्यावरण प्रेमी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती दुलंगे यांनी केले तर आभार वंदना श्रीमल यांनी मानले.