मुंबई : पुणे शहरात शनिवार-रविवारी नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा होती. मात्र शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अजितदादांचं पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमच्या उद्घाटनाला सपत्नीक दर्शन झालं. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि अजितदादांचे काका शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकारांनी त्यांना अजितदादा संपर्काबाहेर असल्यावरुन प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मात्र चर्चा धुडकावून लावल्या.
अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीला विरोध करत नाही, पण जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती अधिक उपयुक्त ठरली असती. १९ विरोधी पक्ष एकत्र आले, पण जेपीसीत त्यांना स्थान मिळणार नाही, भाजपच्या लोकांना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. राहुल गांधींनी आरोप केलेल्या १९ हजार कोटींच्या आकडेवारीबाबत माझ्याकडे माहिती नाही. देशात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्यावर भाष्य करणं मला महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडून मिळते, अदानींचं कौतुक नाही, पण त्यांचं योगदान मान्य करावं लागेल, असंही पवार म्हणाले.
“इथून मी पालघरला जात असेन, तर इथले लोक मलाही नॉट रिचेबलच म्हणणार ना?” असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी पत्रकारांना केला. नॉट रिचेबल म्हणजे नेमकं काय? मला तर माहिती नाही तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलताय, असं म्हणत पवारांनी आपण या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार डळमळण्याच्या शक्यतेवरुन माध्यमांनी पवारांना विचारलं असता, ‘होऊन जाईल, आम्ही पण वाट बघतोय त्या निर्णयाची. तो निर्णय काहीतरी वेगळा आला तर चांगली गोष्ट आहे’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.