आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 28,303 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या देशात कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना व्हायरसच्या 6050 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 28,303 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी 5,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
14 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची देशातील एकूण संख्या 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 85 हजार 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना लसीकरणाबद्दल बोलायचं झालं तर, गुरुवारी 2334 रुग्णांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. यासोबतच देशभरात आतापर्यंत (2.20 अब्ज) लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू झाली होती.
राज्यात एकाच दिवसात 803 कोरोनाबाधित
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असल्याचे चित्र आहे. राज्यात काल (गुरुवारी) 803 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. काल (गुरुवारी) 6 एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात 803 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 3987 सक्रीय कोरोनाबाधित आहेत. राज्यात रुग्ण चाचणीतला पॉझिटिव्ही दर हा चार आठवड्यांआधी 1.91 टक्के इतका होता. तर, मागील आठवड्यात (29 मार्च ते 4 एप्रिल 2023) हा दर वाढून 7.35 टक्के इतका झाला आहे.
मुंबई, ठाण्यातही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महापालिका हद्दीत आज 216 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यातील 19 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनामुळे आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ठाणे महापालिका हद्दीत 48 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, एका बाधिताचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका हद्दीत 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पुणे महापालिका हद्दीत 80 कोरोनाबाधित, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 24. सांगलीमध्ये 20, पालघरमध्ये 26, पनवेल महापालिका क्षेत्रात 13 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.