अध्यक्ष सुनिल पेंडसे यांची माहिती : कोविडच्या खडतर काळानंतर बँकेची गगनभरारी
सोलापूर :सोलापूर जनता सहकारी बँकेने कोविडच्या खडतर काळानंतर बँकिंग क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. २०२२ – २३ या गेल्या आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेस लेखापरिक्षणपूर्व (unaudited) तब्बल २४ कोटी ५० लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर जनता सहकारी बँकेकडे १८११ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ९७४ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २७८५ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७०.८९ कोटी रुपये आहे. तर बँकेची निव्वळ संपत्ती १३७ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १६.९७ टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.
यंदा सोलापूर जनता सहकारी बँकेने ४३.५७ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे. तर बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ४.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. नवीन वाहन खरेदी व गृहकर्जदेखील ८.३० टक्क्यांपासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे.