पुण्यामध्ये एका व्यावसायिकाने भन्नाड आयडिया केली आहे. त्यांच्याकडे EMI वर आंब्याची पेटी मिळणार आहे. सामान्य माणूस महागडे आंबे खरेदी करु शकत नाही, त्यामुळे ही कल्पना एका पुणेकराने पुढे आणलीय.पुण्यातील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सनस यांच्या डोक्यातून ही कल्पना पुढे आली आहे. ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी एक याबाबतचा एक व्हीडिओ करुन फेसबुकवर शेअर केला आहे. यावेळी गौरव सनस यांनी बोलतांना हा भारतातला पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस ईएमआयवर मिळेल, असं ते म्हणाले.
गौरव सनस हे EMI वर हापूस आंबा विकत आहेत. त्यांनी पेटीएमशी करार केला आहे. बारा वर्षांपासून आंबे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गौरव सनस यांचे पुण्यातील सनसिटी रोड येथील आनंद नगर परिसरात चॉकलेट आणि फटाके विक्रीचे दुकान आहे. या वर्षांपासून त्यांनी दुकानात ईएमआयवर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन ग्राहकांनी त्यांच्याकडून प्रत्येकी 30 हजार रुपये किमतीचे आंबे विकत घेतले असून या दोघांनाही वर्षभरासाठी दरमहा 2500 रुपये हप्ता पडेल.
‘लोक ईएमआयवर मोबाईल घेतात. त्यामुळे महागडी वस्तू सहजासहजी विकत घेता येते. असाच आंबाही विकत घेता येईल, अशी कल्पना मला सुचली. पाच हजाराचीही पेटी घेतली तरी आठ महिने किंवा बारा महिन्यांच्या ईएमआयवर ते पैसे फेडता येतात, असं गौरव यांनी यावेळी सांगितलं.