देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. ही चिंताजनक बाब असून आरोग्य विभाग अलर्टवर आहे.
देशातील कोरोनाचा संसर्ग (Covid19 Updates) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशात आज 3016 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. सोमवारी हा आकडा 1573 इतका होता. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. मंगळवारी देशात 2 हजार 151 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढून 2.73 टक्के झालं आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पुढे
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सध्या देशात 13 हजारहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहे. देशातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण 98.78 टक्के आहे. देशात आता 13,509 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसेच गेल्या 24 तासांत 1,396 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 2.73 टक्के तर आठवड्याच्या रुग्ण सकारात्मकता दर 1.71 टक्के इतका आहे.
खबरदारी घ्या, कोरोना टाळा
भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर काळजी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.
XBB 1.16 व्हेरियंटने चिंता वाढवली
देशात सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या XBB 1.16 व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. जगासह देशातही कोविड व्हायरस संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.