फ्रान्सचा युवा स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे याने मागील वर्षी झालेल्या फिफा विश्वचषकात गोल्डन बूट जिंकला. ज्यानंतर आता त्याला राष्ट्रीय संघाचं कर्णधारपद मिळणार आहे.
फिफा विश्वचषक गाजवलेला कायलिन एम्बाप्पे आता फ्रान्स फुटबॉल संघाचा कर्णधार होणार; लवकरच घोषणा
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्सला अर्जेंटिनाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यामुळे एका अत्यंत रोमहर्षक सामन्यात फ्रान्सचा पराभव झाला आणि त्याचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न भंगलं… पण फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेने सामन्यात एकहाती झुंज देत सर्वांचीच मनं जिंकली. ज्यामुळे आता त्याला आपल्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळणार आहे. फ्रान्सच्या या दिग्गज खेळाडूने आपल्या संघाचे प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांच्याशी बोलल्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत ह्युगो लोरिस हा फ्रान्स फुटबॉल संघाचा कर्णधार होता, मात्र जानेवारीमध्ये त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता.
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या पराभवानंतर 36 वर्षीय फ्रेंच गोलकीपर लॉरिसने निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी एका दशकाहून अधिक काळ फ्रान्सचे नेतृत्व केले. लॉरिसच्या निवृत्तीनंतर ही जागा फ्रान्सच्या नव्या कर्णधारासाठी रिक्त राहिली आहे. या पदासाठी अॅटलेटिको माद्रिदचा फॉरवर्ड अँटोनी ग्रीझमन याचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितले जात होते, मात्र आता एम्बाप्पेचा कर्णधार बनण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की पॅरिस सेंट-जर्मेनचा 24 वर्षीय स्टार स्ट्रायकर कायलिन एम्बाप्पे फ्रान्स संघाचा कर्णधार असेल. या आठवड्यात शुक्रवारी युरो कप 2024 च्या पात्रता सामन्यात कर्णधार म्हणून तो प्रथमच मैदानात उतरेल. हा सामना नेदरलँड विरुद्ध स्टेड डी फ्रान्स येथे होणार आहे.
एम्बाप्पे गोल्डन बूटचा विजेता होता
डिसेंबर 2022 मध्ये फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाकडून पराभूत झाल्यानंतर, फ्रान्सचा उपकर्णधार आणि स्टार बचावपटू राफेल वाराणेनेही फुटबॉलला अलविदा केला. यानंतर फ्रेंच मिडफिल्डर अँटोइन ग्रिजमनला फ्रेंच संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं. अशा स्थितीत लॉरिसनंतर केवळ ग्रिजमन फ्रेंच संघाची धुरा सांभाळेल, अशी अपेक्षा होती. जरी ग्रिजमन 32 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत वयामुळे तो कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे, एम्बाप्पेचा कर्णधार होण्याची शक्यता अधिक आहे. कारण तो गेल्या 4 वर्षांपासून उत्कृष्ट फुटबॉल खेळत आहे, गेल्या विश्वचषकातही तो गोल्डन बूट विजेता होता.
एम्बाप्पेची फायनलमध्ये दमदार हॅट्रीक
विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कायलिन एम्बाप्पे यानं सलग तीन गोल करत दमदार अशी हॅट्रिक केली. ज्यामुळे फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये 1966 नंतर पहिल्यांदाच हॅट्रिकची नोंद झाली. कायलिनच्या या कामगिरीनंतर यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर झाले. ज्यामुळं 8 गोल्स स्पर्धेत करत तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला. त्यानं मेस्सीला (7 गोल) मात दिली.