लिंगायत समाजासह बसवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
- सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर व वितरीत केला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातून बसवतत्व आणि वचन साहित्याचा व्यापक प्रचार होणार आहे. त्यामुळे लिंगायत समाजासह बसवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी विद्यापीठातील अध्यासन विभागास भेट देऊन या केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली. लिंगायत समाजातील विविध संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन कुलगुरु डाॅ.मृणालिनी फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राबाबतचा अत्यंत सकारात्मक प्रस्ताव शासनाला सादर केला होता.
त्यानुसार 2019 साली या विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास सरकारने मंजुरी दिली होती. तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निधीसाठी कुलगुरूंनी प्रस्ताव पाठविला होता. अध्यासन कक्षाचे सहाय्यक कक्ष अधिकारी देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी याविषयी उपयुक्त प्रस्ताव सादर केला होता. निधी मंजुरीसाठी उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव आणि संचालकांकडे महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला होता.
- भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही या विषयी निवेदन दिले होते.शिवाय अनेक बसवप्रेमी संघटनांनीही यासाठी केलेल्या पत्रव्यवहार केला होता.याची दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 फेब्रुवारी 2023 रोजी तीन कोटी रूपयांचा निधी विद्यापीठाकडे वितरीत केल्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
- बसवतत्व साहित्य संशोधनाचे अध्यासन केंद्र
शासनाने दिलेल्या या निधीच्या ठेवीच्या व्याजातून मिळणारी रक्कम महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य,बसव विचारांचा प्रचार,शालेय पाठ्यक्रमातील सहभाग, प्रशिक्षण कार्यक्रम,सल्ला व समुपदेशन प्रकल्प,बसव साहित्यिकांच्या अभ्यासासाठी एम फील आणि पी एच डीचे प्रबंधलेखन,असे विविध साहित्यिक उपक्रम राबवून महाराष्ट्रासह देश विदेशातील बसव साहित्यिकांना या अध्यासन केंद्रातून मराठी भाषेतून बसवचरीत्र समाजापुढे ठेवता येणार आहे.यासाठी स्वतंत्र इमारत व कक्षासह अध्यासनासाठी संचालकांची नेमणूक करून आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी डाॅ.बसवराज बगले यांनी केली आहे.