नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई
- मुंबई : मुंबईसह राज्यभरात होळी, रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यंदा होळी आणि रंगपंचमी हे सण ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या दरम्यान विशेष नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन नागरिकांनी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
- अभियान विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी बृहन्मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मुंबई अधिनयम १९५१ चा कायदा XXII) च्या कलम १० (२) सह कलम ३७ मधील उपकलम (१) मधील खंड (सी), (डी) आणि (एफ) व्दारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून काही बाबी प्रतिबंधित केल्या आहेत.
- प्रतिबंधित केलेल्या गोष्टी : अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे, हावभाव किंवा नक्कलेचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किया नैतिकता दुखावते. पादचान्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे, रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे, फेकणे. कोणत्याही नागरिकांनी या वरील नमूद आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलमाच्या अधारे १३५ नुसार शिक्षा करण्यात येणार आहे.
- 5 मार्च ते 11 मार्चपर्यंत लागू : हा आदेश स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांमध्ये अधिकृत राजपत्रांमध्ये आणि प्रत सुस्पष्ट सार्वजनिक ठिकाणी चिकटवून आणि लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करून प्रसिध्द केला जाईल. तसेच हा आदेश 5 मार्च रात्री एक वाजल्यापासून ते 11 मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
- नियमाचे पालन करावे : होळी आणि रंगपंचमी हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खूप मोठा जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. आनंदाला गालकोट लागू नये. म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे पाऊल उचलून नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी ही नियमावली जारी केली आहे. या नियमांचे नागरिकांनी पालन करावे अशी आशा मुंबई पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. जेणेकरून आबाल वृद्ध, लहान मुलांना या सणांचा आनंद घेता येईल. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता मुंबई पोलिसांकडून घेतली गेली आहे.