मुंबई : आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना विधीमंडळ परिसरातील हिरकणी कक्षाची दुरवस्था पाहून आश्रू अनावर झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून सचिवांकडे नागपूरप्रमाणे मुंबईतही हिरकणी कक्ष मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, अत्यंत दुरवस्था झालेला कक्ष त्यांना देण्यात आला आहे, त्यामुळे त्या अधिवेशन सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
सरोज अहिरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार आहेत. त्यांना अडीच महिन्यांचा मुलगा असून त्या आपल्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. मात्र, त्यांना मिळालेला हिरकणी कक्ष पाहून त्या संतप्त झाल्या आहेत. आपल्याला उद्यापर्यंत व्यवस्थित हिरकणी कक्ष मिळाला नाही, तर मी मतदारसंघातील जनतेची माफी मागून मतदारसंघात परत जाणार आहे, असा इशाराही आमदार अहिरे यांनी दिला आहे.
आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून नागपूरप्रमाणे मुंबईच्या विधीमंडळात बालसंगोपनासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती. मागील नागपूर अधिवेशनातही त्या आपल्या लहान बाळाला घेऊन आल्या होता. त्या ठिकाणी त्यांना हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याच पद्धतीचा कक्ष मुंबईतही मिळावा, अशी त्यांची अपेक्षा होती. शासकीय आदेशाप्रमाणे हिरकणी कक्ष स्थापन तर करण्यात आलेला आहे. मात्र, त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. एखादं कार्यालय रिकामं करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल आहे, त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला कसं सोडणार, असा सवालही त्यांनी केला.
माझे बाळ सध्या आजारी आहे, असे असूनही मी देवळाली मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनाला आले आहे. मात्र, त्या कक्षातील घाणेरड्या ठिकाणी मी माझ्या बाळाला सोडून सभागृहातील कामकाजात कशी सहभागी होणार, असा सवालही आमदार सरोज अहिरे यांनी केला. मी आमदार असून मला आश्रू गाळावे लागत असेल तर राज्यातील महिलांची काय अवस्था असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आज माझ्या बाळाची व्यवस्था आज नीट झाली नाही तर मी जनतेची हात जोडून माफी मागते. मी अधिवेशनाला हजेरी लावू शकत नाही, अशा शब्दांत आमदार अहिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.