सोलापूर – येथील विष्णू गुलाब उर्फ चंद्रकांत बरगंडे वय-47, धंदा- नोकरी, रा. शिवाई निवास, औसे वस्ती, आमराई, सोलापूर यास आजरोजी सामूहिक बलात्कारचे गुन्हाकामी अटक करून तपास अधिकारी सोलापूर ग्रामीण अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री काकडे यांचे समोर हजर केले असता कोर्टाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यात हकीकत अशी की,
दि. 31/10/2021 रोजी आरोपी विष्णू बरगंडे व मुख्य आरोपी गणेश कैलास नरळे यांनी संगणमत करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, तिची बदनामी करण्याची धमकी देऊन पुणे येथे फिर्यादीची इच्छा नसताना देखील तिचेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने गणेश कैलास नरळे व विष्णू बरगंडे यांचेविरुद्ध दाखल केली होती. दरम्यान सदर गुन्ह्याकामी फौजदार चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे यास अटक केली होती. त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे याचे विरुद्ध भादवि कलम 417 अंतर्गत दोषारोपपत्र पाठवून आरोपी विष्णू बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. तदनंतर फिर्यादीने सदर अहवालाविरुद्ध व प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फिर्यादीचे याचिकेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ केडर आयपीएस अधिकाऱ्याने करावा असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याकामी पोलीस महासंचालकांनी सदरचा गुन्हा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे वर्ग केला होता. त्याप्रमाणे तपास अधिकाऱ्यानी दिनांक 22/2/2023 रोजी गुन्ह्याकामी आरोपी विष्णू बरगंडे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तपास अधिकाऱ्यानी आरोपीची सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने सरकारी वकील, तपास अधिकारी व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड.प्रशांत नवगिरे, ॲड.श्रीपाद देशक तर सरकारतर्फे ॲड.असावरी जोशी तर आरोपी तर्फे ॲड.महिंद्रकर यांनी काम पाहिले.