सावंतांच्या भेटीनंतर राजन पाटील काय म्हणाले ?
सोलापूर : मागील अनेक महिन्यापासून मोहोळ तालुक्याचे नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि त्यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नाही. याच पार्श्वभूमीवर बुधवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे सोलापूर दौऱ्यावर होते. दुपारच्या सुमारास त्यांनी राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत सत्कार स्वीकारला. यावेळी राजन मालकांसह बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतांनी पाटील परिवाराला भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी राजन पाटील यांना गाठले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सावंत हे कौटुंबिक भेटीसाठी आले होते. भाजप प्रवेशाच्या ज्या बातम्या येत आहेत त्या राजकारणात येत असतात आणि निर्णय घेणारा मी कोण? ज्या मतदारसंघातील लोकांनी 50 वर्ष माझ्या वडिलांचे व माझे नेतृत्व मान्य केले त्यांना विचारल्या शिवाय मी निर्णय घेणार नाही. ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मी सत्तेसाठी इतर कुठे ही जाणारा माणूस नाही, पाटील परिवारावर कितीही मोठी संकटे आली, आम्ही त्याला घाबरत नाही, आम्ही एकनिष्ठ माणसे आहोत.