HSC Exam: या कारवाईत सर्वाधिक 17 कॉपीचे प्रकरणे जालना जिल्ह्यात समोर आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर झाला. या परीक्षेत औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर यासाठी प्रशासनाने एकूण 430 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद (मराठवाडा) विभागात पहिल्याच पेपरला कॉपीची 32 प्रकरणे आढूळन आली आहेत. ज्यात सर्वाधिक 17 कॉपीची प्रकरणे जालना जिल्ह्यात समोर आली आहेत.
बारावीच्या परीक्षेत पहिलाच इंग्रजीचा पेपर असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण होते. तर प्रत्येक सेंटरवर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी भरारी पथकासह बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. सोबतच पोलिसांचा प्रत्यके परीक्षा केंद्रावर विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, असे आले तरीही औरंगाबाद विभागात इंग्रजीच्या पहिल्या पेपरला एकूण 32 कॉपीचे प्रकरणे आढळून आले आहेत. ज्यात जालना 17, औरंगाबाद 3 आणि हिंगोली जिल्ह्यात 12 प्रकरणे समोर आले आहे. विशेष म्हणजे, बीड, परभणी या दोन्ही जिल्ह्यात भरारी पथकाला एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 470 महाविद्यालयातील 60 हजार 400 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते, मात्र परीक्षेच्यावेळी काहींनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. तर जिल्ह्यातील 157 परीक्षा केंद्र आणि 21 परीक्षक केंद्रावर परीक्षा घेतली जात आहे. यासाठी तालुकानिहाय एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच केंद्रनिहाय दोन जणांच्या बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील 48 केंद्रावर 3 जणांचे बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या 100 किमी परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.