आज चौथ्या दिवशी सुनावणी न होता निकालाचे वाचन करण्यात आले. आज सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकिल न्यायालयात हजर होते. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला होणार आहे.
या प्रकरणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा पाच न्यायमूर्तींनी ही सुनावणी पूर्ण केली हाती. या न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज सकाळी हा निकाल दिला. ठाकरे गटाचे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह पाच विधिज्ञ हजर होते. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी, मनिंदरसिंग यांच्यासह १० वकिल उपस्थित होते.
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय पुन्हा विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सूत्रे देण्यासाठीचे काटे मागे फिरवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १४ आमदारांना अपात्र ठरवणार किंवा शिंदे यांची खुर्ची अबाधित ठेवण्याचा निर्णय घेणार याची आता उत्सुकता होती.