मुंबईतील सांताक्रुज वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यातील अवघे पंधरा दिवस संपलेले असताना आतापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात वाढ होणार आहे. तर मुंबईतील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमान वाढलं आहे.
मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत असून मुंबईतील कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेत वाढ झाली आहे.
उर्वरित महाराष्ट्रात काय स्थिती?
मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. उद्या (14 फेब्रुवारी) देखील दोन्ही भागातील किमान तापमान कमीच राहणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत काल (रविवारी) तापमान कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
हिवाळा संपताच लगेच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान असं असले तरी काळजीचं कारण नसून आवश्यक त्या उपाययोजना नागरिकांनी कराव्यात. त्याचसोबत उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली, आणि उन्हापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत.
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम
राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.