पदभार कोहिनकर यांच्याकडे जाण्याची शक्यता
प्रशिक्षणासाठी प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांचेही नाव चर्चेत
सोलापूर : जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी पुन्हा मसुरी येथे जाणार आहे. १३ फेब्रुवारी ते २४ मार्चदरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे. दरम्यान प्रभारी सीईओपदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने व नियुक्त झालेल्या राज्यातील १९ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा ही समावेश आहे.
प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना १० फेब्रुवारी रोजी आपल्या कडील पदभार सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवून १२ फेब्रुवारी रोजी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्र महाराष्ट्र शासन प्रशासन विभागाचे सहसचिव सु.मो. महाडिक यांनी ३ फेब्रुवारी रोजी काढले आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव हे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार संदीप कोहिनकर यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांचेही नाव चर्चेत आहे.