कोरोना साथीनंतर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी होणार आहे. सन १९८६ नंतर संपूर्ण राज्यभर नावाजलेल्या श्री.शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त मंडळ देखील नव्याने करण्यात आले आहे. माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन २१ ट्रस्टी निवडले गेले आहेत.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील एकमेव अशी राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्टीत उत्सव मूर्ती बनविण्यात आली आहे. १२ फुटी फायबरमधील हि आकर्षक मूर्ती ख्यातनाम शिल्पकार उमेश व्हरकट पुणे यांनी साकारली आहे. लोकसहभागातून हि मूर्ती प्रत्यक्षात आली आहे. ह्या मूर्तीचे दर्शन सोलापूरकरांना तसेच शिवप्रेमींना घडावे म्हणून दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या शुभहस्ते होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महात्मा गांधी रोड – टिळक चौक – माणिक चौक – सोन्या मारुती – दत्त चौक – राजवाडे चौक – नवी पेठ – शिवस्मारक मार्गे दळिंबी आड येथे समारोप होणार आहे. तरी छत्रपती शिवरायांच्या नूतन उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी व मानवंदना देण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर (नाना) काळे व उत्सव अध्यक्ष मतीन बागवान यांनी केले आहे.