ICC T20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवनं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्यानं 908 मानांकन रेटिंग मिळवलं आहे.
बोले तो 1 नंबर… ICC क्रमवारीत अव्वल स्थानावर सूर्यकुमार कुमार यादव, इतिहास रचण्यापासून काही पावलं दूर
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा ICC T20 इंटरनॅशनल क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत, सूर्यानं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय. मात्र, त्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात, सूर्यकुमार यादवनं 47 धावांची खेळी खेळून आपल्या क्रमवारीत 910 रेटिंग गुण मिळवलं होते, हे रॅकिंग सूर्याच्या आतापर्यंतच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम रॅकिंग आहे.
लखनऊमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर सूर्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली. दुसऱ्या सामन्यात त्यानं 26 धावांची नाबाद खेळी खेळली, त्यानंतर रँकिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला खरा, परंतु त्याचं रेटिंग 910 वरून 908 पर्यंत घसरलं. असं असलं तरी, सूर्यकुमार भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीचा सर्वोच्च रँकिंगचा फलंदाज बनला आहे.
इतिहास रचण्यापासून फक्त काही पावलं दूर
T20 आंतरराष्ट्रीय, इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत डेव्हिड मलाननं ICC क्रमवारीत सर्वाधिक 915 रेटिंग मिळवलं आहे. मलाननं 2020 मध्ये हे रेटिंग मिळवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत मलानच्या रेटिंगची बरोबरी कोणी करू शकलेलं नाही. आता सूर्याचं लक्ष मलानचा रेकॉर्ड मोडण्यावर असणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 च्या इतिहासात आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग मिळवणारा सूर्यकुमार यादव दुसरा फलंदाज ठरला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्याशिवाय एकही फलंदाज आणि गोलंदाज नाही. तर ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करत सूर्यानं आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यानं स्पर्धेतील एकूण 6 सामन्यात 239 धावा केल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज ODI ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. आणि एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल सहाव्या, विराट कोहली सातव्या आणि रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे.