सोलापूर : श्री क्षेत्र खंडोबा मंदीर बाळे येथील ट्रस्टीमधला वाद विकोपाला गेला असून स्वयंघोषित चेअरमन विनय ढेपे आणि सचिव सागर पुजारी हे बेकायदेशीर कारभार करुन तसेच इतर पुजार्यांना धमकावून मंदीरात आर्थिक भ्रष्टाचार करित असल्याची तक्रार इतर पुजार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. तसेच त्यांच्या कारभाराची चौकशी करुन योग्य कारवाई करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ही बाळे येथील पुजारी आणि नागरिकांनी दिला आहे.
श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदीरात गेल्या चार वर्षापासून विनय ढेपे आणि सागर पुजारी ही मंडळी त्या ठिकाणी गैरकारभार करित आहेत.वास्तविक पाहता सन 2018 पासून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे चेअरमन व विश्वस्त मंडळ स्थापन करणेबाबतचा चेंज रिपोर्ट सादर केलेला नाही. त्यामुळे ते अद्याप ही अधिकृतपणे चेअरमन अथवा सचिव नाहीत तसेच दादागिरी आणि दमदाटी करुन मंदीर समितीचा कब्जा घेतला आहे. तसेच न्यायालयाचा आदेश असतानाही रोख रक्कम तीन दिवसात बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना ही मंडळी मंदीराचा पैसा परस्पर खर्ची घालत आहेत. त्यामुळे श्री खंडोबा देवस्थान बाळेचे अधिकृत चेअरमन सिद्राम पुजारी आणि बाळकृष्ण पुजारी यांनी संबधितांना वकिलामार्फत जाहिर नोटीस दिलेली आहे. तसेच ट्रस्टच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर कोणाला ही अदा करु नये अशी लेखी सूचना केली असताना ही या बँक खात्यातून रक्कम काढली जात असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे.
तसेच मंदीर परिसरात अधिकृत बांधकामे करुन मंदीराचे पुरातत्व असलेले महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार ही करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधितावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी किशोर पाटील, सुनिल पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील, बाळकृष्ण मोकाशी, सुभाष डांगे, मारुती तोडकर, मदन क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुरेश तोडकरी, बाबाराज शेख, सुनील भोसले, ओेंकार कुलकर्णी, अक्षय हैनाळ, वैभव गुरव, अशोक पुजारी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. जर याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या विरोधात आंदोलन करु तसेच त्यावर ही प्रशासनाने कारवाई न केल्यास चक्री उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.