अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 60000 च्या पुढे व्यवहार करत आहे.
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असताना शेअर बाजारात चांगली सुरुवात आहे. आज बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड पाहायला मिळत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. तसेच, निफ्टीची उसळी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात निफ्टीने 17,811.60 अंकांवर व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 81.78 वर पोहोचला आहे.
शेअर बाजाराची चांगली सुरुवात
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. BSE चा सेन्सेक्स 411 च्या वाढीसह 59,961.81 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी देखील 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17,780 वर व्यवहार करत आहे.
गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता
शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमकं (Share Market On Budget Day) कसं वातावरण असणार, याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे. मागील 12-13 वर्षांचा ट्रेंड लक्षात घेता, गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात काही सकारात्मक बाबी समोर आल्याने बाजारात तेजी दिसून आली.
सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सुरु
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. तर सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकी हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
बँक निफ्टीमध्ये एक टक्क्यांची वाढ
बँक निफ्टीमध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. बँक निफ्टी 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 41,085.40 वर व्यवहार करत आहे. ICICI बँकेत 2.28 टक्क्यांची जबरदस्त वाढ झालेली दिसत आहे. कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआयचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी
अर्थसंकल्पाकडून संरक्षण क्षेत्राला मोठ्या आशा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी संरक्षण क्षेत्रातील समभाग वाढतात. बीडीएल, बीईएल गार्डन रीच, एचएएलचे शेअर्स वाढले आहेत.
‘या’ शेअर्समध्ये तेजी
आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय बँक, डीक्सॉन टेक्नॉलॉजी, जिंदाल स्टील, जीटीएल, पॉलिकॅब, महिंद्रा सीआयई, PNC इन्फ्राटेक हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
‘या’ शेअर्समध्ये घसरण
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात अदानी, सन फार्मा, इंडस टॉवर्स, मॅकडॉनल्ड, आयबीएम, कॅटरपिलर हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.