वीरशैव व्हीजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
सोलापूर : केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच भक्ति अथवा सेवा घडते असे नसून घरबसल्या देखील देवाधिकांचे आणि संतांचे विचार अवगत करणे, त्यांचा आपल्या जीवनात आचरण करणे यामधूनही भक्ती अथवा सेवा घडते. वीरशैव व्हिजनच्या सिद्ध सजावट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या मंदिर, कार्य, विचार आणि यात्रेतील सोहळ्यांचे सजावट करण्यातूनही भक्ती आणि सेवा घडली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
रविवारी श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे घेण्यात आलेल्या ‘सिद्ध सजावट स्पर्धे’चे बक्षीस वितरण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी नगरसेवक अमोल शिंदे, विनोद भोसले, प्राचार्य गजानन धरणे, प्रगतशील बागायतदार सिद्धेश्वर कल्लूरकर, सामाजिक कार्यकर्ते आशिष दुलंगे, डॉ. अजित दुलंगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आणि उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
यावेळी धर्मराज काडादी म्हणाले की, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची यात्रा सोलापूरची ओळख बनली आहे. या यात्रेमध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी फक्त नियोजन आणि सुसूत्रता आणण्याचे काम करते. सर्व मानकरी आणि भक्तगण आपापल्या भूमिका व्यवस्थित पार पडतात. त्यामुळे यात्रा प्रतिवर्षी शांततेने पार पाडली जाते. गेल्या काही वर्षांपासून वीरशैव व्हिजनसारख्या काही सामाजिक संस्था यात्रेच्या निमित्ताने अनेक उपक्रम घेत आहेत. त्यामुळे एक यात्रेला आणखी महत्व प्राप्त होत आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होत आहे.
स्पर्धेच्या परीक्षणाचे काम चित्रकार शरण अळळीमोरे आणि रंगावलीकार मल्लिनाथ जमखंडी यांनी केले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत चिदानंद मुस्तारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले. आभार सोमेश्वर याबाजी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय साखरे, आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, बसवराज जमखंडी, सचिन विभूते, अमित कलशेट्टी, संगमेश कंठी, सोमनाथ चौधरी, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, महेश विभुते, आनंद नसली, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी आदींनी परिश्रम घेतले.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रथम (15 हजार ₹) – शरणबसप्पा रामपुरे, द्वितीय (11 हजार ₹) – मल्लिकार्जुन जेऊरे, तृतीय (9 हजार ₹) – अंजली पुजारी, चतुर्थ (7 हजार ₹) – चिन्मयी सोपल (बार्शी), पाचवा (6 हजार ₹) – तेजस गवळी, सहावा (5 हजार ₹) – डॉ. गौरी बाचल, सातवा (4 हजार ₹) – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज गर्ल्स हॉस्टेल, आठवा (3 हजार ₹) – दिव्या कोकाटे (पुणे) तसेच उत्तेजनार्थ (प्रत्येकी 1 हजार ₹) दिपाली पाटील, विजय आवटे, दिपाली कोष्टी, राजश्री तमशेट्टी, प्रणिता डांगे.