देगाव-देशमुख वस्ती विजापूर बायपास रोडवर उड्डाण पुलावरून खाली कोसळून १२ कळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन काळवीट जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. वनविभाग आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास चालू आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्ते अपघातात अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडले असून महामार्गावर जाणाऱ्या सुसाट गाड्यांखाली उद मांजर (सिवेट) सर्प, काळवीट, लांडगे, कोल्हे व इतर पक्षी इ. वन्यजीव गाड्याखाली चिरडून मरण्याच्या घटना घडत आहेत. महामार्ग दुतर्फा मोठे झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आणि रोडकिलचे प्रमाण वाढत चालले आहे. मागच्या वर्षी याच देशमुख वस्ती सोलापूर विजापूर बायपास महामार्गावर दोन काळवीटाचा रस्ता ओलांडताना पुलावरून पडून मृत्यू झाला. त्याच ठिकाणी घडलेली मागील दोन वर्षातील ही सलग तिसरी दुर्दैवी घटना घडल्यामुळे पर्यावरणप्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रस्ते अपघातग्रस्त वन्यजीवांचे जीव वाचावेत आणि त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोशिएशन, सोलापूर या पर्यावरणप्रेमी संस्थेकडून मागील वर्षी प्राण्यांचे मुखवटे घालून अनोख्या पद्धतीने वन खात्याला निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापही परिस्थिती जैसेथेच असल्यामुळे पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे. हे रस्ते अपघात टाळण्यासाठी वन विभाग आणि रस्ते विकास महामंडळ यांनी एकत्रितरित्या योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. महामार्ग ओलांडतांना अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यजीव अपघातात जागीच गतप्राण होतात. ‘रोडकिल’ची वाढती समस्या वन्यजिवांच्या मुळावर उठली आहे. महामार्गावर वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर उदरनिर्वाह करण्यासाठी मृत प्राण्यांवर भूक भागविणारे अन्य वन्यजीव रात्रीच्या सुमारास तेथे येतात आणि त्यांचाही वाहनांखाली चिरडून मृत्यू होतो, अशा या ‘रोडकिल’च्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोलापुरातील वनक्षेत्र असलेल्या महामार्गालगत प्राण्यांसाठी भुयारी मार्ग तयार करून देणे अत्यावश्यक आहे. तसेच या परिसरात वेग मर्यादेचे फलक लावले पाहिजेत अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.