शार्दुल ठाकूर याला सामनावीर तर शुभमन गिल याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा किवींना व्हाईट वॉश, टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला.
शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी केली भारतानं 50 षटकांत 385 धावा करत न्यूझीलंडला 386 धावांचं लक्ष्य दिलं. डेव्हॉन कॉन्वेनं 138 धावांची खेळी केली, पण इतर कोणाची साथ न मिळाल्यानं अखेर न्यूझीलंड 90 धावांनी पराभूत झाला.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी सुरु ठेवली. दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली, ज्यामुळे भारताची धावसंख्याही 200 पार गेली. रोहित 101 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर काही वेळात शुभमनही 112 धावा करुन तंबूत परतला.
विराटनं 36 धावांची खेळी केली पण तोही तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं 54 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामुळे भारताची धावसंख्या आणखी मजबूत झाली. 385 धावा भारताने स्कोरबोर्डवर लावल्या असून आता न्यूझीलंडला 386 धावा 50 षटकांत करायच्या होत्या.
न्यूझीलंडचा संघ 386 धावा करण्यासाठी मैदानात आला असताना सुरुवातीला त्यांनी ठिकठाक खेळी केली. पण काही विकेट्स गेल्यावर इतर फलंदाज झटपट बाद झाले अखेर 41.2 षटकांत 295 धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला आणि भारताने 90 धावांनी सामना जिंकला.
न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वेने 138 धावांची एकहाती झुंज दिली. याशिवाय हेन्री निकोल्सने 42 आणि मिचेल सँटनरनं 34 धावांची खेळी केली पण अखेर न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला.
भारतानं श्रीलंकेनंतर न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश दिला आहे. सामनावीर म्हणून शार्दूल ठाकूर तर मालिकावीर म्हणून शुभमन गिलला पुरस्कृत करण्यात आलं आहे. या विजयासह टीम इंडिया आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचली आहे.