होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा करुन सुरू आहे. सर्व सुविधांनी उत्कृष्ट विकसित एअरपोर्ट अथॉरिटी अॉफ इंडियाच्या देखरेखीखाली असलेल्या होटगी रोड विमानतळावरून भारत सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पां पैकी एक केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत सदर विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन वेळा निवड होऊनही सामान्य सोलापूरकरांना नागरी विमानसेवा उपलब्ध होऊ न शकल्याने सोलापूरकरांच्या तीव्र भावना आमच्या पर्यंत ईमेल, प्रशासनाच्या विविध विभागां अंतर्गत प्राप्त शेकडो पत्र आणि निवेदनाद्वारे आमच्या पर्यंत पोहचत असलेल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना सांगितले.
होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेतील सर्व अडचणी आणि अडथळे दूर करुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच सर्व सोलापूरकरांसाठी आम्ही विमानसेवा सुरू करणारच आहोत, असे ठोस आश्वासन सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषण आणि सोलापूर विकास मंचच्या वतीने डिसेंबर महिन्यात आयोजित भव्य मुक मोर्च्या विषयीची संपूर्ण माहितीपर वृत्तांत सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील ४५ लाख लोकसंख्येवर प्रभाव असलेल्या सोलापूरातील तब्बल १९८ पेक्षा अधिक नामांकित संस्था आणि संघटनेच्या वतीने पाठिंबा प्राप्त झाला, अॉनलाईन आणि अॉफलाईन पद्धतीने देश विदेशातुन तब्बल १२,५०० पेक्षा अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि अॉनलाईन पद्धतीने सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. ह्या सर्वांच्या जनभावनांचा आदर करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सर्व अडथळे तात्काळ दुर करुन नागरी विमानसेवा सुरू करावी अशी विनंती सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली.