सोलापूर महापालिकेच्या वतीने पत्रकारांचा गौरव
सोलापूर : पत्रकार हे प्रशासनाचे कान आणि डोळे आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला प्रश्न माहिती समजते. शहर विकासात प्रशासनाबरोबरच पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकारांनी नीती मूल्ये जपली पाहिजे. सुचिता पाळावी. पत्रकार आणि प्रशासनाच्या समन्वयातून शहर सुंदर व समृद्ध करूया असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले.
सोलापूर महापालिकेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सभागृहात सकाळी आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते विविध माध्यमांच्या पत्रकार व छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे,उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिद्र घोलप, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी कस्तुराबाई चौगुले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त शीतल तेली – उगले पुढे म्हणाल्या, शहर सुधारणा व विकासामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकार हा प्रशासनाचे कान व डोळे आहेत. जिथे प्रशासन पोहोचत नाही तिथे पत्रकार पोचतात. लोकांचे प्रश्न व माहिती प्रशासनापर्यंत त्यांच्या माध्यमातून मिळू शकते. त्या आधारे प्रशासनाला कार्यवाही करता येते. शहरात विकासाची परिभाषा बदलत राहते. त्या अनुषंगाने सुधारणा या समन्वयातून करता येतील, असे त्या म्हणाल्या.
या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार यांनी केले. प्रास्ताविक महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश कदम यांनी केले. महापालिका पत्रकार संघाचे सरचिटणीस किरण बनसोडे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार व छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.