शोभायात्रेत 13 विद्यापीठांचे भारतीय संस्कृतीवर सादरीकरण
सोलापूर- भारत माता की जय.. हम सब एक है.. देश हमारा प्यारा.. कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..अशा देशभक्तीच्या घोषणांनी आणि जयजयकारांनी सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परिसर दणाणला. निमित्त होते, राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाचे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्कर्ष महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास विद्यापीठ कॅम्पसमधून शोभायात्रा निघाली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांत कुमार वनंजे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अँबेसिडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे आणि समन्वयक डॉ. केदारनाथ कळवणे यांची उपस्थिती होती.
या शोभायात्रेत एकूण 13 विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने एकसंघ भारताच्या संकल्पचा संदेश दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या संघाने भारतीय संस्कृतीवर शोभायात्रेत सादरीकरण केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघाने आदिवासी बांधवांचा शोभायात्रेत सन्मान केल्याचे दिसून आले. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघाने भारतीय संस्कृतीचा जागर केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने अवयव दान श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले तसेच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही जागर केला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाने माता अंबाबाईचा जागर केला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने शोभायात्रेत सहभागी होऊन मुली वाचवा, देश वाचवा तसेच स्त्री अत्याचार थांबवण्याचे संदेश दिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एचएसएनसी विद्यापीठ, आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबईच्या संघानेही यात सहभाग नोंदविला.